कारवारमध्ये कारवर झाड पडून महिलेचा मृत्यू

अग्निशामक दलाने पोलीस, स्थानिकांच्या मदतीने झाड हटवले


4 hours ago
कारवारमध्ये कारवर झाड पडून महिलेचा मृत्यू

झाड कोसळलेल्या कारमधील महिलेला वाचवण्यासाठी बचाव कार्य करताना अग्निशामक दलाचे जवान.
...
वार्ताहर। गोवन वार्ता
जोयडा : गर्भवती सुनेला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या सासूचा कारवर झाड कोसळल्याने मृत्यू झाला. कारवार शहरातील पिकळे हॉस्पिटलजवळ रविवारी ही दुर्घटना घडली. लक्ष्मी नारायण ममतेकर (५५) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मल्लापूर येथील लक्ष्मी ममतेकर या आपल्या एक महिन्याची गर्भवती सून सुनीता यांना घेऊन कारवार येथे डॉक्टरांकडे कारमधून आल्या होत्या. जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाल्याने कार जिल्हा हॉस्पिटल नजीकच्या एका झाडाखाली थांबाविली होती. सुनीता यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठवून सासू लक्ष्मी या कारमध्येच बसल्या होत्या. त्याच वेळी एक झाड वारा आणि पाऊस यामुळे मुळासकट उन्मळून कोसळले. त्याचा मोठा भाग कारवर पडल्याने कार झाडाखाली दबली गेली. लक्ष्मी यांना बाहेर येता न आल्यामुळे त्या कारमध्येच अडकल्या. लक्ष्मी यांना रक्तस्राव होत होता, त्यांचा श्वास गुदमरत होता. गाडीचे छत त्यांच्या शरीराच्या अर्ध्यावर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने झाडाचे खोड कापून दोरीचा वापर करून लक्ष्मी यांना कारमधून बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास कारवार पोलीस करत आहेत.