दोन दिवसांत धार्मिक भावना बिघडवणारे दोन प्रकार उघड
पणजी : आल्तिन्हो येथील फादर आग्नेलो रोडजवळ असलेल्या क्रॉसची मोडतोड करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सतीश सुब्रमण्यम (४०, कुड्डालोर-तमिळनाडू) याला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १९ जुलै रोजी रात्री ९ ते १० या वेळेत घडला होता.
फादर आग्नेलो रोड येथील रहिवासी जोसेफ वाझ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने रस्त्यालगत असलेल्या क्रॉसची मुद्दामहून मोडतोड करून धार्मिक भावना दुखावल्या. या तक्रारीच्या आधारे पणजी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सतीश सुब्रमण्यम याची ओळख पटवून २१ जुलै रोजी अटक केली. त्याला पणजी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्याच्या ढासळलेल्या मानसिक अवस्थेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्याला मानसोपचार केंद्रात (आयपीएचबी) येथे पाठवण्याचे आदेश दिले.
बागा-हडफडे येथील सेंट क्रॉस चॅपेलमध्ये घुसखोरी व चोरी :
दुसऱ्या घटनेत, २१ जुलै रोजी पहाटे ६.२० च्या सुमारास बागा-हडफडे समुद्रकिनाऱ्यावरील सेंट क्रॉस चॅपेलचे कुलूप तोडून एका लाकडी खुर्चीची चोरी करण्यात आली. या प्रकरणी ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील विवेक बलवंतराय बत्रा याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन कामगारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माजी आयआरएस अधिकारी असलेल्या बत्रा यांच्यावर चॅपेलच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा व आतून खुर्ची चोरल्याचा आरोप आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या डायगो फर्नांडिसने हे कृत्य पाहून माहिती दिल्यानंतर चॅपेलचे अध्यक्ष रॉनी फर्नांडिस यांनी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या घटनेत मिलाग्रीस सायबीणीची मूर्ती बाजूला ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३२९(४), २९८, ३०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.