पावसाळी अधिवेशन | दिवस दूसरा | म्हादईच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ!

विरोधकांची हौद्यात धाव; सभापतींच्या आश्वासनानंतर झाले शांत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd July, 02:29 pm
पावसाळी अधिवेशन | दिवस दूसरा | म्हादईच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ!

पणजी : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हादईच्या मुद्द्यावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधकांनी थेट हौद्यात धाव घेतली. सभागृहातील गोंधळ पाहता, सभापतींनी म्हादई प्रश्नावर चर्चा घेण्यास अखेर मान्यता दिली. यानंतर गदारोळ शांत झाला. म्हादई प्रश्नावर विशेष चर्चा व्हावी आणि दर आठवड्यात कळसा भांडूरा प्रकल्पासंदर्भात आढावा सादर करावा अशीही मागणी करण्यात आली.



कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कर्नाटकाकडून पाणी वळवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकार गुपचूपपणे पाइपलाईनच्या माध्यमातून म्हादईचे पाणी मलप्रभा प्रकल्पात वळवत आहे का, यावर सरकारने पावले उचलली आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान सरकार या प्रकरणी गंभीर असून अवमान याचिका दाखल केली आहे असे उत्तर जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभागृहात दिले.




कर्नाटकने नेलसे येथील जंगलात पाईप निर्मितीचे युनिट उभारले असून, जर त्यांना परवानगी मिळाली, तर ते आठवड्यात  मलप्रभा नदीच्या नवलतीर्थ धरणात म्हादईचे पाणी वळवू शकतात असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका वृत्तवाहिनीच्या अहवालाचा उल्लेख करत सांगितले. सरदेसाई यांनी म्हादईसाठी स्थापन करण्यात आलेल्या सभागृह समितीवरही टीका केली. ही समिती बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली.




मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर उत्तर देताना, कर्नाटककडून नदीचे पाणी वळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे मान्य केले. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची आपण भेट घेतली होती. अशा प्रकल्पांना कोणतीही परवानगी दिली नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, भविष्यातही ही परवानगी नाकारण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा