पेडणे : मालपे येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर बायपास रस्त्यालगत उभारण्यात आलेली संरक्षण भिंत सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, ती कधीही कोसळू शकते, असा इशारा काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. जितेंद्र गावकर यांनी दिला आहे. त्यांनी सरकारकडून याकडे वेळोवेळी दुर्लक्ष झाल्याची टीका केली.
संबंधित ठिकाणी मागील वर्षी दरड कोसळल्यानंतर भिंत कोसळली होती. त्यानंतर पुन्हा उभारलेली संरक्षण भिंतही निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप गावकर यांनी केला. सध्या भिंतीच्या मागे मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. यामुळे भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सततच्या पावसामुळे ही भिंत कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
तातडीने या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. संभाव्य दुर्घटनांचा विचार करता हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करावा आणि पर्यायी मार्ग म्हणजे जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वापरण्यात यावा. अशी मागणी गावकर यांनी निवेदनाद्वारे पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्याकडे केली.
गेल्या वर्षी भिंत कोसळली तेव्हा एका वाहनचालकाचे प्राण थोडक्यात वाचले होते. त्यानंतर रस्ता आठ महिने बंद ठेवून भिंतीचे पुनर्बांधकाम करण्यात आले होते. मात्र पुन्हा निकृष्ट काम केल्याचे चित्र वाहनचालकांत नाराजीचे कारण ठरत आहे. या भागात डोंगर कापल्यामुळे सुरुवातीपासून दरडी कोसळण्याचा धोका राहिला आहे. त्यामुळे रस्ता खुला करण्याआधी सुरक्षिततेची खात्री करूनच पुढील निर्णय घेण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.