पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात होत आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेसह खात्यांच्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. अधिवेशनासाठी ७८९ तारांकित तर ३,३३० अतारांकित प्रश्न आले आहेत. लॉटरी पद्धतीने प्रश्न चर्चेला येतील. याशिवाय शून्यप्रहर, लक्षवेधी सूचना असतील.
काल अनेक महत्त्वाचे प्रश्न सभागृहात चर्चेला आले. संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी त्या प्रश्नांचे शंकानिरसन देखील केले. आमदार उल्हास तुयेकर यांनी सामान्य गोमंतकीयांना परवडेल अशा घरांची गरज असल्याचे म्हटले. त्यांनी यासाठी गृहनिर्माण मंडळाच्या लिलाव पद्धतींत बदल करण्यात यावे असे सुचवले. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर यथोचित तोडगा काढण्यात येथील असे आश्वासन दिले. गोवेकरांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी पेडणेत जागा निश्चित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा :
गोवेकरांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणारपेडणे तालुक्यात जागा निश्चित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्र्यांची माहिती
यानंतर, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन विविध सरकारी खात्यांत, महामंडळांत आणि विभागांत ७ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘टेम्पररी स्टेटस’ देऊन मोठा दिलासा दिला. १ ऑगस्टपासून लाभ मिळेल असे ते म्हणाले. यापुढे रोजंदारीवर भरती नाही असेही त्यांनी काल स्पष्ट केले.
हेही वाचा :
संध्याकाळी, हिंस्र प्राणी किंवा कुत्र्यांचे संगोपन व प्रजनन यावर बंदी घालण्यासाठी गोवा प्राणी प्रजनन, नोंदणी व नुकसानभरपाई विधेयक राज्य सरकारने विधानसभेत सादर केले. हिंस्र प्राण्यांचे प्रजनन किंवा संगोपन केल्यास मालकाला १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत कारावास व ५० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.
जमिनीचे मूल्य निश्चित करणारे विधेयक सादर
राज्यात एखादे गाव, शहर किंवा जमिनीचे मूल्य ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सहमतीने समिती नेमण्याची तरतूद असलेले गोवा सूट मूल्यांकन विधेयक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सादर केले.
हेही वाचा :
राज्यात हिंस्र प्राणी, कुत्र्यांवर बंदीचा प्रस्ताव
LIVE : 🔴(अपडेटसाठी पेज रिफ्रेश करा.)
दुपारी : १.०० : रोरो फेरीच्या शुल्काचा वाद!
रोरो फेरीच्या शुल्काच्या मुद्द्यावरून आमदार विरेश बोरकर आणि नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आमनेसामने. मंत्री उलट उत्तर देत असल्याचा आरोप करून विरोधकांचा गदारोळ.
दुपारी १२:४५ : कोकणी ज्ञान असणे आवश्यक
गोव्यातील पोस्ट खात्यात गोमंतकीयांनाच नोकरी मिळावी यासाठी कोकणीचे ज्ञान असणे सक्तीचे करावे यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी कोकणी अकादमी प्रमाणपत्र जारी करेल. ज्यांनी १०वीचे शिक्षण मराठीत केले आहे त्यांनी चाचणी देऊन प्रमाणपत्र घ्यावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
दुपारी १२;२५ : म्हादईच्या प्रश्नावरून गदारोळ.
म्हादईच्या प्रश्नावरून विधानसभेत गदारोळ. या मुद्द्यावर चर्चा सुरू रहावी म्हणून विरोधकांची हौदात धाव. प्रश्नोत्तरावरील चर्चेला सभापतींनी मान्यता दिल्यानंतर गदारोळ थांबला.
सकाळी ११:३५ : स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना १९ डिसेंबर पर्यंत मिळणार सरकारी नोकरी
आतापर्यंत ३७३ स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित २५ आणि अपात्र ठरलेल्या ४० जणांना येत्या १९ डिसेंबर पर्यंत सरकारी नोकऱ्या दिल्या जातील : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.