मुख्यमंत्र्यांची माहिती : पर्वरीतील डीआयईटी इमारत असुरक्षित, दुरुस्तीला सुरुवात
पणजी : सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सरकारी शाळा आणि विद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करायला सुरुवात केली आहे. ५६८ शाळा आणि विद्यालयांचे ऑडिट पूर्ण झाले आहे, मात्र ३०२ शाळा, विद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट लांबणीवर पडले आहे. ते पूर्ण झालेले नाही, अशी लेखी माहिती शिक्षणमंत्री या नात्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पर्वरी येथील डीआयईटी (ट्रेनिंग कॉलेज) इमारत असुरक्षित असून त्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरू झाले आहे. सरकारी शाळा तसेच विद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याविषयीची कुठलीही योजना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. काही सरकारी शाळा तसेच विद्यालयांच्या इमारतींची स्थिती खराब होती. पावसाळ्यात काही शाळांच्या इमारतींना गळती लागली होती. यामुळे शाळा तसेच विद्यालयांच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. यासाठी सरकारने २०२१ साली शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या त्या, त्या विभागाला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम दिले होते.
आतापर्यंत ५६८ शाळा, विद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे. ३०२ शाळा, विद्यालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप पूर्ण झालेले नाही. पर्वरी येथील ट्रेनिंग कॉलेज इमारतीची नॉन डिस्ट्रक्टिव टेस्ट (एनडीटी) झाली आहे.