दाबोळी विमानतळावर सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर
पणजी : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर गोव्यातील हवाई वाहतुकीत मोठा बदल घडून आला असून, या नव्या विमानतळाच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारला तब्बल ६५.८८ कोटींचा महसूल मिळाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेत दाबोळी विमानतळावरील सेवा कमी होत असल्याची चिंता आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, दाबोळी विमानतळावर सेवा देणाऱ्या अनेक विमान कंपन्या मोपा विमानतळावर स्थलांतरित झाल्यामुळे दाबोळी विमानतळाची स्थिती डळमळीत झाली आहे.
सरकारचा दाबोळी विमानतळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. दोन्ही विमानतळे कार्यान्वित राहणार आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. सरासरी ५० विमाने दररोज मोपा व दाबोळी विमानतळांवरून ये-जा करतात. यामुळे गोव्यात येणाऱ्या विमानांची संख्या दुपटीने वाढली आहे. दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांसाठी केंद्र सरकारकडून सबसिडीत वाढ करण्यात आली असून, त्याठिकाणी सुविधा वाढवण्यावर सरकार भर देत आहे. यावेळी 'मोपा'मुळे गोव्यातील पर्यटन आणि हवाई संपर्क सुधारत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.