दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांचे आदेश
मडगाव : दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी धबधबे व बंद पडलेल्या चिरे खाणींचे खंदक असलेल्या परिसरात प्रवेश करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आणि तलाठ्यांना दिले.
वास्कोतील दामबाबाचा सप्ताह, स्वातंत्र्य दिन आणि इतर कायदा व सुव्यवस्था विषयक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. दक्षिण गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे असलेल्या धबधब्यांवर आणि पाणवठ्यांच्या ठिकाणी नागरिक आणि पर्यटकांची वाढती गर्दी, तसेच अपघातांच्या घटनांमुळे प्रशासनाने यापूर्वीच प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश लागू केले आहेत. विशेषतः शनिवार-रविवारच्या दिवशी या ठिकाणी गस्त वाढवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्हे नोंदवले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी क्लिटस यांनी दिली.
या बैठकीत जिल्ह्यातील धिरियो आणि वाळू उत्खननासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.