मच्छीमारांचे प्रश्न संसदेत मांडणार : खासदार फर्नांडिस

प्रस्तावित जेटीबाबत मच्छीमारांकडून चिंता व्यक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th July, 11:40 pm
मच्छीमारांचे प्रश्न संसदेत मांडणार : खासदार फर्नांडिस

मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेताना खासदार फर्नांडिस. (संतोष मिरजकर)

मडगाव : राज्यातील मच्छीमार समुदायाला अनेक समस्या भेडसावत आहेत. मच्छीमारांनी प्रश्न मांडण्यास मागेपुढे पाहू नये. विविध प्रकल्पांमुळे मच्छीमारी बंद होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. मच्छीमारांचे प्रश्न संसदेत मांडणार, असे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
खासदार फर्नांडिस यांनी दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, चिंचणी, असोळणा येथील मच्छीमारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मच्छीमारांनी प्रस्तावित जेटी बाबत चिंता व्यक्त केली. गोव्यातील किनाऱ्यावर मच्छीमार पिढ्यान् पिढ्या मासळीचा व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका चालवत आहेत. मात्र, काही लोक आता विकासाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्याची वाट लावत आहेत. त्याचा फटका मच्छीमारांना बसत आहे. याची जाणीव आपल्याला आहे. पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न संसदेत मांडणार आहोत, असे आश्वासन दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी दिले. यावेळी मच्छीमारांनी जाळी, बोट ठेवण्यासाठी जागा नसल्यासह परप्रांतीय ट्रॉलर्सकडून होणाऱ्या त्रासासह अनेक समस्या खासदारांसमोर मांडल्या. मच्छीमारांचे प्रश्न नक्कीच संसदेत मांडू व आपल्याला या विषयावर संसदेत बोलण्याची संधी मिळाली नाही तर संबंधित खात्याच्या मंत्रालयाला पत्र लिहून मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा