ग्रामसभा तापली : संतप्त नागरिकांकडून पंचायत मंडळ धारेवर
मुळगाव ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभेत प्रश्न मांडताना ग्रामस्थ.
डिचोली : मैदान आणि बेकायदेशीर प्रकल्पांच्या विरोधात रविवारी झालेली मुळगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच तापली. मैदान प्रकल्प आणि आरएमसी प्लांट विरोधात संतप्त नागरिकांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.
गेल्या २० वर्षांपासून गावासाठी मैदानाची मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल युवा वर्गाने संताप व्यक्त केला. मागील वर्षी मुळगाव कोमुनिदादच्या जागेत मैदान प्रकल्पाचा शुभारंभ होऊनही काम सुरू होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यासाठी प्रकल्पाच्या वास्तूविशारदाशी (आर्किटेक्ट) बैठक घडवून आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी केळबाई देवस्थान समितीचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, कोमुनिदाद अध्यक्ष महेश्वर परब, शेतकरी समितीचे अध्यक्ष प्रकाश परब, माजी सरपंच संतोष सराफ, मनोज गाड, सुरेंद्र गाड, यशवंत परब, झिलू परब, ओंकार परब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरएमसी प्लांटला तीव्र विरोध
वॉर्ड क्रमांक एकमध्ये होऊ घातलेल्या आरएमसी प्लांटला (तयार काँक्रिट प्रकल्प) ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. नागरिकांनी विरोध दर्शवूनही या प्रकल्पाला पुन्हा मान्यता देण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले होते. या विषयावर पंचायत मंडळाला जाब विचारल्यानंतर, सरपंच मानसी कवठणकर यांनी सदर प्रकल्पाचा परवाना रद्द करण्याचे आश्वासन दिले.