जोयडा : कारवार तालुक्यातील अंकोला अगसूर पुलावरून आज पहाटे बस नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झालेत. त्यातील ५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
ही बस बेळगाव येथून मंगळूरूला जात होती. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने कारवार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मंगळूरु येथे पाठवण्यात आले आहे. अंकोला पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान खराब रस्त्यामुळे स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. खराब रस्त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असून त्याचा स्थानिकांही फटका बसत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्ती केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.