बंगळुरू : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री येथील एका खासगी महाविद्यालयातील दोन प्राध्यापक आणि त्यांच्या मित्राने एका विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पीडित तरुणी त्या महाविद्यालयातच शिकत होती. आरोपी नरेंद्र (भौतिकशास्त्र शिक्षक) आणि संदीप (जीवशास्त्र शिक्षक) या दोघांनी तिला शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने बंगळुरूला बोलावले. नरेंद्रने तिच्यावर आधी बलात्कार केला. त्यानंतर संदीपने त्याचा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार केला. अनुप नावाच्या मित्रानेही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धमकावत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
ही घटना सुमारे महिन्याभरापूर्वीची असून, पीडितेने पालकांना सांगितल्यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाच्या निर्देशावरून मराठहळ्ळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेने खळबळ माजली असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षणसंस्थांमधील व्यवस्थेकडे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.