चीनची अत्याधुनिक लष्करी तयारी ! ड्रोन नव्हे, तर आता मधमाश्यांचे थवे चीनच्या लष्करात

वैज्ञानिकांकडून कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th July, 12:22 pm
चीनची अत्याधुनिक लष्करी तयारी ! ड्रोन नव्हे, तर आता मधमाश्यांचे थवे चीनच्या लष्करात

चीन: चीनची संरक्षण प्रणाली (China Defence) ही सध्या जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक असलेल्या संरक्षण व्यवस्थांपैकी एक मानली जाते. पारंपरिक युद्धशक्तीच्या पलीकडे जाऊन चीनने सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती नियंत्रण या क्षेत्रांमध्येही आपली पकड निर्माण केली आहे. चीनचा उद्देश केवळ आपली सीमारेषा सुरक्षित ठेवणे एवढाच नसून, जागतिक सामर्थ्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणे हाही आहे.

चीन दरवर्षी आपल्या या संरक्षण प्रणालीवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. आता, चिनी सैन्यात मधमाश्यांचीही एन्ट्री होऊ शकते. होय, चिनी वैज्ञानिकांनी मधमाश्यांसारख्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अद्वितीय तंत्रज्ञान (ब्रेन कंट्रोलर) विकसित केल्याची माहिती मिळाली आहे. हे उपकरण मधमाश्यांना आपल्या इच्छेनुसार उडवण्यासाठी वापरलं जातं. यामागचा उद्देश मुख्यतः सैनिकी आणि गुप्तचर कार्यांसाठी वापरण्याचा आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान मधमाश्यांना नियंत्रित करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहे. अशा परिस्थितीत, मधमाश्यांचे थवे युद्धात (Bee Army) चीनसाठी एक मोठे शस्त्र सिद्ध होऊ शकतात, असे अनुमान वर्तवले जात आहे.


सर्वात हलकी माइंड कंट्रोलर मशीन
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'नुसार, ब्रेन कंट्रोलर बनवणाऱ्या बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी जगातील सर्वात हलके ब्रेन कंट्रोलर तयार करून दाखवले आहे, ज्याचे वजन फक्त ७४ मिलिग्रॅम आहे. हे ब्रेन कंट्रोलर लावल्यानंतर १० पैकी ९ मधमाश्यांनी वैज्ञानिकांचे आदेश पाळले आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेने उड्डाण करण्यास सुरुवात केली.


नेमके काम कसे होते?
सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणे मधमाश्यांच्या शरीरावर विशेषतः त्यांच्या पंखांजवळ किंवा मज्जासंस्थेच्या भागावर बसवली जातात. हे उपकरण न्यूरोसिग्नल्स किंवा इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन्स वापरून मधमाश्यांची दिशा नियंत्रित करू शकते. वैज्ञानिक हे सिग्नल्स रिमोट कंट्रोलद्वारे पाठवतात, त्यामुळे मधमाशी उजवीकडे वळावी, थांबावी, उड्डाण करावं अशा सूचना देता येतात. १० पैकी ९ मधमाश्यांनी या आदेशाचे अचूक पालन केल्याचे वैज्ञामिकांच्या तपासणीत सिद्ध झाले आहे.

हे तंत्रज्ञान भविष्यात अभूतपूर्व वैद्यकीय, बचाव आणि लष्करी कार्ये सुलभ करू शकते. पण नैतिक, पर्यावरणीय आणि सुरक्षा दृष्टीने मोठे प्रश्न निर्माण करू शकतात. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने साधलेली ही प्रगती सूक्ष्म नियंत्रित सायबॉर्ग मधमाश्यांची  विज्ञान-रोबोटिक्स आणि जैव-मार्गदर्शन क्षेत्रात मैलाचा दगड ठरू शकते. तंत्रज्ञानात जरी क्रांती असली तरी, त्याबरोबर येणारे धोके, नैतिक प्रश्न आणि पर्यावरणीय परिणाम याकडेही प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे.

हेही वाचा