तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर अग्नितांडव; मालगाडीला भीषण आग

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित नाही

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर अग्नितांडव; मालगाडीला भीषण आग

चेन्नई : चेन्नई बंदरातून इंधन घेऊन जाणारी एक मालगाडी तिरुवल्लूरजवळ अचानक रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रेल्वे घसरल्यामुळे डब्यांमधील इंधनानं अचानक पेट घेतला. या लागलेल्या आगीत आत्तापर्यंत पाच डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. आगीमुळे परिसर धुराने व्यापला आहे. उर्वरित डबे रेल्वे पासून तातडीने वेगळे करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित झाली नाही. इंधनाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळी १० हून अधिक अग्निशमन दलाच्या टीम आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत. तर स्थानिक सुरक्षिततेसाठी परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

स्थानिक रेल्वे सेवा तात्पुरती बंद
दक्षिण रेल्वेने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून लोकल ट्रेन सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय, आठ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून, पाच गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच आठ गाड्यांना त्यांच्या अंतिम स्थानकापूर्वीच थांबवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा