नवी दिल्ली : तुम्ही जेवणात जास्त मीठ घालता का? मग सावधान! कारण जास्त मीठ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (एनआयई ) दिला आहे.
भारतात नागरिक सरासरी प्रमाणापेक्षा जास्त मीठ घेतात. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अहवालानुसार, एका व्यक्तीने दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे. मात्र भारतातील शहरी भागात सरासरी ९.२ ग्रॅम आणि ग्रामीण भागात ५.६ ग्रॅम मीठ घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रमाण धोकादायक असल्याचे एनआयईचे वैज्ञानिक डॉ. शरण मुरली यांनी स्पष्ट केले.
ही समस्या कमी करण्यासाठी एनआयईने कमी सोडियम असलेल्या मिठाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मिठात सोडियम क्लोराईडऐवजी पोटॅशियम किंवा मॅग्नेशियमयुक्त मिश्रण असते, जे आरोग्यासाठी तुलनेत सुरक्षित मानले जाते.
पंजाब आणि तेलंगणात या मोहिमेचा तीन वर्षांचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये लोकांना मीठ कमी खाण्याचे फायदे सांगितले जात आहेत आणि त्यांचा रक्तदाब तसेच मीठ वापराचे प्रमाण सातत्याने तपासले जात आहे. या प्रकल्पाला आयसीएमआरचा पाठिंबा आहे.
एनआयईचे दुसरे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. गणेश कुमार यांनी सांगितले की, जनतेत आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून आणि कमी सोडियमयुक्त मीठाचा वापर वाढवून देशातील वाढता रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी करता येईल. एकंदरीत, मीठ म्हणजे फक्त चव नव्हे तर आरोग्याशी थेट संबंधित बाब आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवण्याची वेळ आता आली आहे.