मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठा साम्राज्याच्या दुर्गवैभवाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांच्या काळातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक आणि गौरवाचा क्षण आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामाविष्ट झाले आहेत. हे महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर सर्व देशवासीयांसाठी अभिमानाचे क्षण आहेत, अशा स्वरूपाची पोस्ट त्यांनी केली.
या यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी (सर्व महाराष्ट्रात) आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या निकषांवर आधारित मूल्यांकनात या किल्ल्यांची लष्करी, स्थापत्य व सांस्कृतिक वैशिष्ट्ये, गनिमी काव्यासारख्या अभूतपूर्व युद्धतंत्राचा वापर आणि सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा प्रभावी उपयोग या बाबी निर्णायक ठरल्या.
या यशामध्ये केंद्र सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व संस्कृती मंत्रालयाचा मोलाचा वाटा राहिला. मराठा लष्करी स्थापत्य या प्रस्तावाची निवड पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोच्या ४६व्या अधिवेशनासाठी केली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ ह्वाजोंग ली यांनी प्रत्यक्ष या किल्ल्यांना भेट दिली होती. मानांकन प्रक्रियेत पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, वास्तुविशारद डॉ. शिखा जैन, राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजदूतांशी संपर्क साधत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्री आशिष शेलार यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि वारसा आता जागतिक स्तरावर पोहोचला असून, महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि पर्यटनवृद्धीसाठीही ही निवड निर्णायक ठरणार आहे.