पणजी : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध चिगुळे माऊली मंदिरात शुक्रवारी (११ जून) चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दोन दानपेट्या फोडल्या आणि त्यातील रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे मंदिरासमोरील पवित्र तिर्थकुंडात दारू आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या असून त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
हे मंदिर दरीच्या टोकावर वसलेले असून येथून तिलारी धरणाचा आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य परिसराचा विहंगम नजारा दिसतो. त्यामुळे वर्षा पर्यटनाच्या हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी दुपारी काही पर्यटक मंदिरात देवदर्शनास आले होते. ग्रामस्थांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने मंदिरात गेल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरीबरोबरच काही समाजकंटकांनी तिर्थकुंडात दारू आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. हे कुंड धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हुल्लडबाज पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या घटनेची माहिती जांबोटी पोलीस चौकीतील सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.के. पाटील यांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मंदिर परिसरातील सुरक्षितता वाढवावी आणि धार्मिक स्थळांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही ग्रामस्थांची मागणी आहे.