पंजाबच्या जालंधरमध्ये रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक
जालंधरः जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून ओळखले जाणारे जगविख्यात मॅरथॉनपटू फौजा सिंह (Fauja Singh) यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. सोमवारी १४ जुलै रोजी दुपारी ३.३० पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात रस्ता पार करत असताना त्यांचा अपघात झाला, त्यातच त्यांचा दुदैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार ते ११४ वर्षांचे होते. आपल्या गावी ब्यासमध्ये चालण्यासाठी निघाले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना टक्कर दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे फौजा सिंह यांना जालंधर येथील रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती जालंधर पोलीस (Police) आणि ‘द टर्बन्ड टॉरनेडो’ पुस्तक लिहिणारे लेखक खुशवंत सिंह यांनी प्रसारित केली.
आदमपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरदेवप्रीत सिंह यांनी सांगितले की, या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याची ओळख अजूनपर्यंत पटली नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत असून घटनास्थावरून वाहन आणि चालकाचे काही पुरावे सापडल्याची माहिती मिळाली आहे. खुशवंत सिंह यांनी सोशल मीडियावर फौजा सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
फौजा सिंह यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी वैयक्तिक दुःखावर मात करण्यासाठी धावण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. १०० व्या वर्षी पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यांच्या या विक्रमी कामगिरीने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. वयोमानाची मर्यादा ओलांडत विविध वयोगटांमध्ये जागतिक विक्रमांची मालिका प्रस्थापित केल्यानेच त्यांना ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या धावण्यातील सातत्य, मनोबल आणि शारीरिक तंदुरुस्तीने ते आरोग्य, दीर्घायुष्य आणि जिद्दीचे जागतिक प्रतीक बनले होते. त्यांच्या जाण्याने क्रीडा जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.