मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर; टेकऑफनंतर दोन्ही इंजिन...

कॉकपीटमधील दोन वैमानिकांदरम्यान झालेला संवाद आला समोर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर; टेकऑफनंतर दोन्ही इंजिन...

अहमदाबादः गुजरातमधील अहमदाबाद येथे मागील महिन्यात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. यासंदर्भात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद पडले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. कॉकपीटमधील दोन वैमानिकांदरम्यान झालेला संवाद सुद्धा समोर आला आहे.

या अहवालानुसार, विमानाच्या इंजिनांना इंधनपुरवठा नियंत्रित करणारे स्विच बंद झाल्याने हा अपघात घडला. उड्डाणानंतर तीन सेकंदांतच दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा खंडित झाला. त्यामुळे विमान कोसळले. पायलट आणि सह-पायलट यांच्यातील संवादातून हे स्पष्ट झालं आहे. महत्त्वाचे म्हणजे एअर इंडियाने २०१८ च्या एफएए मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचंही तपास अहवालातून समोर आलं आहे.

वैमानिकांमधील संवाद...
उड्डाणानंतर काही सेकंदांतच इंधनाचा कटऑफ स्विच सुरु झाला. त्यामुळे पायलटने सह-पायलटला विचारलं की “तू इंधन का बंद केलं?” यावर सह-पायलटने “मी काहीच केलं नाही” असे उत्तर दिल्याचं कॉकपीटमधील रेकॉर्डींगमध्ये नमूद आहे. यावेळी इंजिन बंद झाल्याने रॅम एअर टर्बाइन (RAT) आपोआप सुरु झालं. पण इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे.

यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विच बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उड्डाणावेळी स्वीच कटऑफवरुन रनवर
जेव्हा विमान उड्डाण करत असतं तेव्हा इंधन नियंत्रित करणारा स्वीच हा कटऑफवरुन रनवर केला जातो. असं केल्यानेच इंजिन पूर्ण क्षमतेनं काम करुन उड्डाण करता येतं, असं अहवालात म्हटलं आहे. दोन्ही इंजिन वापरण्यासाठी फुल अथोरिटी डुएअल इंजिन कंट्रोलचा वापर केला जातो. ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने इंधनाचा वापर करुन उड्डाण भरण्यास मदत करते.

विमानात कमी इंधन
अहवालात म्हटले आहे की, विमानाचे फ्लॅप लँडिंग गियर आणि थ्रस्ट लीव्हर सामान्य स्थितीत होते. हवामान देखील स्वच्छ होते आणि पक्षी धडकण्याची कोणतीही घटना घडली नाही. इंधनाचे नमुने ठीक असल्याचे आढळून आले परंतु क्रॅश झालेल्या विमानातून खूप कमी इंधन सापडले. २०१८ मध्ये, FAA ने अशा इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग यंत्रणेबद्दल एक सल्ला जारी केला होता. परंतु एअर इंडियाने ही तपासणी केली नाही.


नेमकं काय घडलं होतं
१२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेघनानगरमधील एका वसतिगृह संकुलावर कोसळले होते. या दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर केंद्र सरकारने तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

हेही वाचा