तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

२०१५ साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

हैदराबाद: तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कोटा श्रीनिवास राव यांचे हैदराबादमधील फिल्मनगर येथील त्यांच्या राहत्या घरी आज रविवारी पहाटे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अवघ्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. कोटा श्रीनिवास गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. कोटा श्रीनिवास यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिणेतील चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ७५० हून अधिक चित्रपटांत काम केले. तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कांकीपाडू येथे १० जुलै १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. कोटा श्रीनिवास राव यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खरेधू' या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. खलनायकाच्या भूमिकांसाठी कोटा श्रीनिवास यांनी अनेक पुरस्कारही मिळाले होते. दम्मू', 'सन ऑफ सत्यमूर्ती' आणि 'डेंजरस खिलाडी' हे त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी काही चित्रपट आहेत. २०१५ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री'ने सन्मानित केले.

राजकीय कारकिर्द
राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम करत विजयवाडा पूर्व मतदारसंघातून १९९९ ते २००४ दरम्यान आमदार म्हणून जबाबदारी पार पाडली. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "आपल्या बहुमुखी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांचे कलात्मक योगदान आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय राहतील. त्यांनी खलनायक, विनोदी आणि चरित्र भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या जाण्याने तेलुगू चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे."

हेही वाचा