हासन : चिक्का तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालेक्कल तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात रविवारी झालेल्या धार्मिक मेळाव्यात प्रसाद खाल्ल्यानंतर तब्बल ५० हून अधिक भाविक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
रविवारी मंदिरात मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका खासगी संस्थेमार्फत भाविकांना दह्याचा प्रसाद देण्यात आला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रसाद वाटण्यात आला व सुमारे १,५०० लोकांनी तो घेतल्याचे समजते. त्यानंतर सोमवारी अनेकांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्या झाल्या. त्यातील ५० हून अधिक रुग्णांना अरसीकेरे तालुक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सुदैवाने वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे मोठी आपत्ती टळल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील सुलवाडी येथील मंदिरातही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण आजारी पडले होते.
या घटनेमुळे धार्मिक ठिकाणी वाटण्यात येणाऱ्या प्रसादाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.