मुख्यमंत्री : आयेशा प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचनेवर चर्चा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर प्रदेशसह देशातील अन्य राज्यांत जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराविरोधात कायदा करण्यात आला आहे. सध्या गोव्यात अशा कायद्याची गरज आहे. याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा देणे आवश्यक अाहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. सोमवारी विधानसभा अधिवेशनात आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नुकत्याच गोव्यात उघडकीस आलेल्या आयेशा ऊर्फ निक्की या प्रकरणाबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणात उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणात चंगुर बाबा नामक व्यक्तीला पकडले आहे. याआधी गोव्यातदेखील जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्या एका बाबाला अटक करण्यात आली आहे. तो बाबा लोकांना बसमधून घेऊन जात होता. त्याची ‘बाबागिरी’ आम्ही बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात लव्ह जिहादची प्रकरणे पुढे आली होती. यामध्ये लव्ह जिहाद नसल्याचा आरोप झाला असला तरी जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे उघडकीस झाले होते. याबाबतची आकडेवारी लवकरच देण्यात येईल.
ते म्हणाले, सरकार गोव्यातील धार्मिक एकोपा बिघडणार नाही, याची काळजी घेत आहे. गोव्यात आंतरधर्मीय विवाह होतात. हिंदू धर्मीय ख्रिश्चन धर्मियांशी किंवा मुस्लिमांसोबत लग्न करतात. ही त्या जोडप्यांची वैयक्तिक इच्छा आहे. मात्र जबरदस्ती अथवा पैशाचे किंवा अन्य अमिषे दाखवून धर्मांतर केले जाऊ नये. आयेशा ऊर्फ निक्की प्रकरणात गोवा पोलीस उत्तर प्रदेश पोलिसांच्या आठ दिवस आधी संपर्कात होते. उत्तर प्रदेश पोलिसांना आवश्यक माहिती दिली जात होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
तत्पूर्वी प्रेमेंद्र शेट यांनी आयेशा प्रकरणामुळे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे सांगितले. देशभर मोठे गुन्हे घडत असताना आयेशा गोव्यात राहत होती, याची माहिती गोवा पोलिसांना कशी समजली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विजय सरदेसाई यांनी गोवा गुन्हेगारांसाठी सेफ बेस बनल्याचा आरोप केला. या प्रकरणी स्थानिक इंटीलिजंट अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. युरी आलेमाव यांनी पोलीस विरोधी पक्ष नेत्यांना त्रास देतात, मात्र मोठ्या गुन्हेगारांकडे त्यांचे लक्ष नसल्याचा आरोप केला.
भाडेकरू गुन्ह्यात आढळल्यास घर मालकालाही अटक
मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा पोलिसांनी आतापर्यंत ६६ हजार भाडेकरूंची तपासणी केली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यापुढे एखाद्या मोठ्या गुन्ह्यात भाडेकरू आढळल्यास त्याच्या घर मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे. आपल्या भागात कोण राहाते याची माहिती पंचायत, पंच सदस्यांनी ठेवणे आवश्यक आहे.