शनिवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ : आतापर्यंत राज्यात सरासरी ६२.७९ इंच पाऊस
प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : मागील दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक ९०.४४ इंच (२२९७.२ मिमी) पाऊस धारबांदोडा भागात झाला आहे. यंदा उत्तर गोव्याच्या तुलनेच दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. धारबांदोडा, सांगे भागात अन्य भागांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
पणजी वेधशाळेने शनिवारपर्यंत (२६ जुलैपर्यंत) मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या. थांबून थांबून पाऊस पडत असल्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते. राज्यात आतापर्यंत ६२.७९ इंच (१५९४.८ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा फक्त ०.४ टक्के कमी आहे. मागील २४ तासांत २ इंच पावसाची नोंद झाली. या काळात काणकोणमध्ये ४ इंचापेक्षा अधिक पाऊस झाला. या हंगामात ३ जुलै रोजी सर्वाधिक ६.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
दरवर्षी वाळपई, साखळी भागात अधिक पाऊस पडतो. यंदा मात्र सांगे, धारबांदोडा, केपे भागात पाऊस अधिक झाला आहे. सांगे भागात ८४.९७ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सून गोव्यात लवकर दाखल झाला. ११ जूनपर्यंत पाऊस किरकोळ होता, नंतर मात्र पावसाने गती वाढवली. पुन्हा जूनच्या अखेरीला पाऊस कमी झाला. जुलैमध्ये पावसाने पुन्हा आपली लय पकडली आहे.