आर्थिक संधींमुळे कोकणी भाषेचाही विस्तार शक्य

प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो : कोकणी लेखक संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात लेखकांचा गौरव


4 hours ago
आर्थिक संधींमुळे कोकणी भाषेचाही विस्तार शक्य

सन्मानित करण्यात आलेल्या लेखकांसह प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो, उदय भेंब्रे आणि इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आर्थिक ताकद आणि सक्षम राजकीय नेतृत्वामुळे जगभरात इंग्रजी भाषेचा प्रसार झाला. कोकणी भाषेलाही आर्थिक ताकद मिळेल आणि विस्तार होईल. कोकणी भाषेचे भविष्य उज्ज्वल आहे, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो यांनी व्यक्त केला. कोकणी लेखक संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पणजीतील सरस्वती मंदिरच्या फोमेंतो सभागृहात रविवारी आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात प्रतिष्ठित लेखकांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ लेखक उदय भेंब्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दत्ता दामोदर नायक, दिलीप बोरकर, सुशिला हळर्णकर आणि शैला प्रभुदेसाई यांना अवधूत तिंबलो यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष गौरीश वेर्णेकर, मिलिंद भरणे आणि इतर उपस्थित होते. उद्योजक अवधूत तिंबलो पुढे म्हणाले की, इंग्रजी ही आपली भाषा नाही. तरीही सर्व राज्यांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील लोक इंग्रजी बोलतात. त्यामुळे ती ज्ञानाची किंवा आर्थिक विकासाची भाषा बनली आहे. प्रत्येकाला स्वतःचे पोट भरण्यासाठी इंग्रजी बोलण्याशिवाय पर्याय नाही. बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे भविष्यात कोकणीतही आर्थिक संधी निर्माण होतील. पुढची पिढी कोकणीसाठी अधिक वेळ देऊ शकेल आणि तिचे भविष्य उज्ज्वल असेल.
मी नाटक, कथा यासह विविध प्रकारांमध्ये लेखन केले. मात्र मी नाटक, कादंबरीमध्ये यशस्वी झालो नाही, प्रवास वर्णन प्रकारात यशस्वी झालो, असे दत्ता दामोदर नाईक यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले. मी साहित्यात आणि जीवनात प्रयोग करत राहतो. साहित्यातून खूप काही शिकायला मिळाले, असे दिलीप बोरकर यांनी सांगितले. साहित्य हे समाजासाठी असले पाहिजे. लेखकाने समाजाचा विचार करून साहित्य निर्माण करावे, असे सुशिला हळर्णकर म्हणाल्या.
भाषेचा सामाजिक, सरकारी वापर वाढला पाहिजे : भेंब्रे
गोमंतकीयांनी कधीही कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही. यामुळे गोव्यातील लोक बहुभाषिक बनले. साहित्य मोठ्या प्रमाणात तयार झाल्यास भाषा टिकते किंवा विस्तारते, असे नाही. संस्कृत आणि लॅटिनमध्ये दर्जेदार साहित्य आहे. तरीही त्या भाषांचा विस्तार झाला नाही. साहित्य निर्मितीबरोबरच भाषेचा आर्थिक, सामाजिक आणि सरकारी वापर वाढला पाहिजे. म. गांधी आणि पं. नेहरूंनी खूप लिहिले; पण ते साहित्यिक प्रकारात मोडत नाहीत. साहित्याव्यतिरिक्त भूगोल, इतिहास आणि इतर विषयांतही कोकणीमध्ये लेखन होण्याची आवश्यकता आहे, असे मत उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.