गोव्यातून अटक झालेली आयेशा 'फंड मॅनेजर'!

बेकायदेशीर धर्मांतर प्रकरण : पती निघाला ‘लीगल अॅडव्हायझर’


20th July, 11:52 pm
गोव्यातून अटक झालेली आयेशा 'फंड मॅनेजर'!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : देशभर गाजत असलेल्या बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी सकाळी जुने गोवा येथून आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा ऊर्फ निक्की (३५) हिला अटक केली. ती एका जिहादी नेटवर्कची ‘फंड मॅनेजर’ आहे, असे स्पष्ट झाले आहे. ती मूळची ओडिशाची असून यापूर्वी गोव्यात सांतान-तळावली, सांतआंद्रे येथे भाड्याच्या घरात राहत होती. ती काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांसोबत जुने गोवा येथील खासगी इस्पितळाच्या परिसरात असलेल्या इमारतीत स्थायिक झाली होती. शुक्रवारी जुने गोवा पोलिसांच्या मदतीने तिला अटक करण्यात आली. अटकेनंतर तिच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. तिच्यासह या कामात गुंतलेल्या इतर ९ जणांच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले.
उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘मिशन अस्मिता’अंतर्गत ही कारवाई पार पडली. आयेशा ही देशभरात धर्मांतर घडवणाऱ्या एका जिहादी नेटवर्कची अर्थ व्यवस्थापक (फंड मॅनेजर) होती, असे समोर आले आहे. यूएई, अमेरिका, कॅनडा आणि लंडन येथून कोट्यवधी रुपये तिच्या खात्यांमध्ये जमा होत होते. ते ती भारतात विविध खात्यांत वर्ग करत होती. या रकमेचा वापर ब्रेनवॉशिंग आणि धर्मांतर करण्यासाठी केला जात होता.
तपासात आलेल्या माहितीनुसार, कॅनडास्थित सय्यद दाऊद अहमदकडून आयेशाच्या खात्यात नियमितपणे निधी येत होता. या रकमेचा हवालामार्फत वापर केला जात होता. दाऊद सोशल मीडियावर जिहादचा प्रचार करण्यासाठी व्हिडिओ तयार करून प्रसारित करत होता. आयेशाचा पती अली हसन ऊर्फ शेखर राय हा कोलकात्याचा रहिवासी असून स्थानिक न्यायालयात कर्मचारी आहे. तो या रॅकेटमध्ये ‘लीगल अ‍ॅडव्हायझर’ म्हणून कार्यरत होता. धर्मांतर प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे दूर करण्याचे काम तो करत होता.
या रॅकेटचे धागेदोरे लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटनांशी जोडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नेटवर्कमधील सर्वांत धोकादायक सदस्य अल रहमान कुरैशी (आग्रा) हा असून तो सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्यासाठी ब्रेनवॉश करत होता. त्याच्यासोबत असलेला ओसामा (कोलकाता) मुलींना त्यांच्या कुटुंबांपासून तोडण्याचे काम करत होता. आयेशा उच्चशिक्षित असून गोव्यात तिचे स्वतःचे घर आहे. तिचे वडील माजी लष्करी अधिकारी (सुबेदार) होते. तिच्या अटकेने गोव्यात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
असा झाला नेटवर्कचा पर्दाफाश...
एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने बनावट इंस्टाग्राम आयडीद्वारे जिहादी नेटवर्कशी संपर्क साधला.
‘डिजिटल इन्फिल्ट्रेशन’ तंत्राचा वापर करून या रॅकेटपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
मोबाईल लोकेशन्स, कॉल डिटेल्स व इंटरनेट आयडींची बारकाईने तपासणी करून या टोळीतील सदस्यांना गजाआड करण्यात आले.
आतापर्यंत १० जणांना अटक
धर्मांतराच्या नावाखाली सुरू असलेल्या डिजिटल नेटवर्कद्वारे हिंदू आणि गैर-मुस्लिम मुलींना जाळ्यात ओढले जात होते. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १० जणांना अटक केली आहे. उर्वरित संपर्क व आर्थिक पुरवठ्याचे तपशील मिळविण्यासाठी तपास अधिक खोलवर सुरू आहे.
दहा दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणात अटक केलेल्या आयेशा आणि इतरांना आग्रा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व संशयितांना १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
आयेशा-अलीची पहिली भेट बंगळुरात
आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा आणि कोलकात्याचा रहिवासी असलेल्या अली हसन ऊर्फ शेखर राय यांची पहिली भेट बंगळुरूमध्ये शिक्षण घेत असताना झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी लग्न केले. याच दरम्यान दोघांनी धर्मांतर केले. इतर मुलींना बेकायदेशीरित्या धर्मांतर करण्यासासाठी ते दोघे भाग पाडत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.