बचावकार्य सुरू
मुंबई : वांद्रे पूर्वेतील भारत नगर परिसरात शुक्रवारी (१८ जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास एक तीन मजली चाळ कोसळली. चाळ क्रमांक ३७ चा दुसरा आणि तिसरा मजला कोसळला. ढिगाऱ्याखालून मदतीसाठी येणाऱ्या आवाजांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या ८ ते १० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई पोलीस, बीएमसी कर्मचारी, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. दुर्घटनेचे गांभीर्य पाहता ‘लेव्हल-२’ची आपत्ती घोषित करण्यात आली आहे.
बचाव पथकात २ एडीएफओ, ५ वरिष्ठ अग्निशमन अधिकारी, ५ फायर इंजिन्स, मोबाइल वर्कशॉप, रेस्क्यू व्हेईकल, वॉटर रिस्पॉन्स युनिट अशा सर्व यंत्रणांचा समावेश आहे. सध्या ७ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक आणि जुन्या चाळींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)