दोडामार्ग : वडील आणि ११ वर्षांचा मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांकडून मदतीचे आवाहन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th July, 01:29 pm
दोडामार्ग : वडील आणि ११ वर्षांचा मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांकडून मदतीचे आवाहन

दोडामार्ग : शिरंगे बोडण (ता. दोडामार्ग) येथील मूळ रहिवासी आणि सध्या मायना-कुडतरी (सासष्टी) येथे वास्तव्यास असलेले अभिमन्यू अर्जुन नाईक हे त्यांचा ११ वर्षांचा मुलगा आकाश नाईक याला सोबत घेऊन चार दिवसांपूर्वी दोडामार्ग येथे जाण्यासाठी निघाले असून, ते अद्याप घरी परतलेले नाहीत.

या प्रकरणी अभिमन्यू यांची पत्नी अनुष्का नाईक यांनी कुडतरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार आता दोडामार्ग पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आली आहे.

अनुष्का यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या काही कामानिमित्ताने वास्को येथे बहिणीकडे गेल्या होत्या. परत आल्यावर पती अभिमन्यू आणि मोठा मुलगा आकाश घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पतीला फोन केला, मात्र संपर्क झाला नाही. नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींकडूनही चौकशी केली, पण कुठेही काही ठोस माहिती मिळाली नाही.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, अभिमन्यू नाईक हे गोव्यातून मूळ गावी शिरंगे बोडणला निघाले होते. मात्र ते तेथे पोहोचले नाहीत. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन दोडामार्ग तालुक्यातील तेरवण गावात दिसून आले. त्या भागात पोलिसांनी शोधमोहीमही राबवली, मात्र त्यांच्याबाबत अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. 

 वरील फोटोतील वडील अभिमन्यू अर्जुन नाईक आणि मुलगा आकाश नाईक कोठेही दिसल्यास कुडतरी पोलिस किंवा दोडामार्ग पोलिस स्थानकाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आव्हान पोलिसांनी केले आहे. 

हेही वाचा