पश्चिम बंगाल : डिजिटल अरेस्ट प्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
पश्चिम बंगाल : डिजिटल अरेस्ट प्रकरणी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा

कोलकाता : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीमधील नऊ जणांना पश्चिम बंगालमधील कल्याणी जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पश्चिम बंगाल आणि पर्यायाने भारतातील या प्रकारची शिक्षा झालेले हे पहिलेच प्रकरण आहे.

नेमके प्रकरण काय ?

७० वर्षीय एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करून मुंबईतील अंधेरी पोलीस स्थानकाचा सहाय्यक निरीक्षक असल्याचे भासवूत धमकावण्यात आले. त्याला धमकावत वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर सदर व्यक्तीस जवळपास सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवून त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळण्यात आले. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी याबाबत कल्याणी, राणाघाट पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपासादरम्यान या गँगने देशभरातील १०८ नागरिकांकडून एकूण १०० कोटींहून अधिक रक्कम लुबाडल्याचे समोर आले. या गँगने भद्रेश्वरमधील आणखी एका ज्येष्ठ नागरिकाचीही फसवणूक केली होती. या व्यक्तीकडून ४१ लाख रुपये उकळले गेले होते, तेव्हा त्यांची पत्नी कर्करोगाशी झुंज देत होती.

पोलिसांनी तपासात असेही स्पष्ट केले की, फोन कॉल्स कंबोडियातून केल्याचे भासवले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कॉल्सचा उगम भारतातच होता आणि ते फक्त कंबोडियातून रीरूट केले जात होते. पैशांचे व्यवहार देशभरातील वेगवेगळ्या बोगस खात्यांमार्फत करण्यात आले. तपासात अनेक बँक पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आले.

या प्रकरणात गुजरातमधील ३, महाराष्ट्रातील ७ आणि हरियाणामधील ३ अशा एकूण १३ जणांना अटक करण्यात आली होती. २,६०० पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले.या आरोपींवर आयपीसीच्या कलमांबरोबरच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(क) व ६६(ड) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील ९ जणांवर कल्याणी न्यायालयात आरोप निश्चित करून फास्ट ट्रॅक पद्धतीने पाच महिन्यांत खटला चालवण्यात आला.

हेही वाचा