वॉशिंग्टन/न्यू यॉर्क : जगप्रसिद्ध कोल्डप्ले कॉन्सर्टमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे अमेरिकेतील ‘एस्ट्रोनॉमर’ या टेक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी बायरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली असून, त्यांचा राजीनामा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने स्वीकारला आहे.
कोल्डप्ले कॉन्सर्टमधील क्षण ठरला वादग्रस्त
घटना मॅसाच्युसेट्सच्या जीलेट स्टेडियममधील आहे. कोल्डप्लेच्या कार्यक्रमादरम्यान, स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर एक पुरुष आणि महिला एकमेकांना मिठी मारतानाचा क्षण दाखवण्यात आला. गायक ख्रिस मार्टिन यांनीही मंचावरून या दोघांची गंमतीदार टिप्पणी करत ओळख करून दिली.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ काही क्षणांतच तुफान व्हायरल झाला. टिकटॉकसह अनेक प्लॅटफॉर्मवर यावर मीम्स तयार झाले. पुढे या व्यक्तींची ओळख अँडी बायरन आणि कंपनीतील चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबट अशी सांगितली गेली. मात्र, याबाबत दोघांनी कोणतीही अधिकृत कबुली दिलेली नाही.
कंपनीने सुरू केली अंतर्गत चौकशी
एस्ट्रोनॉमरने सुरुवातीला अँडी बायरनना रजेवर पाठवल्याचे जाहीर केले होते. नंतर एका निवेदनात कंपनीने स्पष्ट केले की, ‘एस्ट्रोनॉमर’ आपल्या मूल्यप्रणाली आणि नैतिकतेसाठी कटिबद्ध आहे. वरिष्ठ पदाधिकारी आदर्श वर्तन करतील अशी अपेक्षा असते. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, तात्पुरते सीईओ म्हणून पीट डीजॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावर मोठ्याप्रमाणात मिम्स देखील व्हायरल होताहेत.
व्हायरल व्हिडिओने कंपनीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
या व्हिडिओमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेवर आणि नेतृत्वाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक बनावट निवेदने सोशल मीडियावर पसरवली गेली होती, ज्यामुळे गोंधळ वाढला. याबाबत कंपनीने स्पष्ट केले की सध्या कोणतेही अधिकृत विधान अँडी बायरन यांच्याकडून आलेले नाही.
‘एस्ट्रोनॉमर’ ही डेटा प्रक्रियेतील सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी असून, डेटा अॅनालिटिक्स, एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानातील विविध साधने ही कंपनी विकसित करते. कॉर्पोरेट जगतातील आचारसंहिता आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने या प्रकरणाने चर्चेला नवे वळण दिले आहे.