सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
मुंबई : कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एआय-२७४४ (AI2744) या विमानाला सोमवारी (२१ जुलै) सकाळी ९.२७ वाजता लँडिंग करताना अपघात घडला. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर उतरताना विमान घसरले आणि रनवेच्या बाहेर गेले. या अपघातात विमानाचे तीन टायर फुटले असून इंजिनचेही नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनेनंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानावर नियंत्रण मिळवले आणि ते सुरक्षितपणे गेटपर्यंत आणले. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीच्या टचडाऊन झोनजवळ उतरल्यानंतर विमान १६ ते १७ मीटर बाजूला गेले होते. त्यामुळे मुख्य धावपट्टीचे किरकोळ नुकसान झाले असून ती तत्काळ बंद करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून दुसरी पर्यायी धावपट्टी सुरू करण्यात आली आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) अधिकारी विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित विमानाची तांत्रिक तपासणीही सुरु आहे.