गोवा : केरळातील एकाही व्यक्तीची नेमणूक कुलगुरूंकडून नाही!

राज्यपाल पिल्लई : नेमणूक केल्याचे निदर्शनास आणल्यास सार्वजनिक कार्यातून होणार मुक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
गोवा : केरळातील एकाही व्यक्तीची  नेमणूक कुलगुरूंकडून नाही!

पणजी : गोवा विद्यापीठात कुलगुरूंनी केरळातील एकाही व्यक्तीची नेमणूक केल्याचे निदर्शनास आल्यास सार्वजनिक कार्यातून मी मुक्त होईन. मल्याळी वा धोतीवाल्यांचे गोवा विद्यापीठात प्राबल्य असल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असे मावळते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (p s sreedharan pillai) यांनी विद्यापीठाचे कुलपती या नात्याने स्पष्ट केले.

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा गोव्याचे राज्यपाल म्हणून कार्यकाळ संपला असून नव्या राज्यपालांचा शपथविधी २६ जुलै रोजी होणार आहे. राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त होताना त्यानी प्रुडंट मीडियाला ‘हेड ऑन’ कार्यक्रमात मुलाखत दिली. प्रुडंट मीडियाचे (Prudent Media) संचालक संपादक प्रमोद आचार्य (Pramod Acharya) यांनी ही मुलाखत घेतली.

गोवा विद्यापीठात सर्व नेमणुका नियमानुसार झालेल्या आहेत. कुलपती वा कुलगुरूंच्या मर्जीनुसार नेमणुका झालेल्या नाहीत. कुलगुरूंच्या निवडीसाठी माझ्याकडे प्रक्रियेनुसार तीन नावे आली. त्यातील एकाची मी निवड केली. यात कोणतीही वशिलेबाजी झालेली नाही, असे पिल्लई म्हणाले. घटनात्मक अधिकाराच्या आधारावर कार्यकारी मंडळावर केरळमधील दोन व्यक्तींची मी निवड केली. दोन्ही व्यक्ती शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आहेत. २०१८ ते २०२० या काळासाठी कार्यकारी मंडळावर उत्तर भारतातील पाच व्यक्तींची नेमणूक झाली होती. त्यावेळी कोणताही आरोप झाला नाही. विद्यापीठात धोतीवाले वा मल्याळी लोकांचे वर्चस्व असल्याचा आरोप दुर्दैवी व तथ्यहीन आहे. माझ्याच कार्यकाळात विद्यापीठाचे मानांकन बी प्लस वरून ए प्लस झाले. विद्यापीठासाठी व माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे, असे ते म्हणाले. गोवा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा मिळण्याची संधी हुकल्याने मोठे नुकसान झाले आहे.

लोकशाहीत जनता सर्वोच्च!

गोव्यातील राज्यपालपदाचा कार्यकाळ हा माझ्यासाठी आनंददायी होता. अन्नधन योजनेबरोबर कर्करोग, डायलिसीस रूग्णांना मदत देणारी योजना सुरू केली. लोकशाहीत जनता ही सर्वाेच्च असते, हे ब्रीद मी मानत आलेलो आहे. गोव्यातही हेच ब्रीद मानून कार्य केले, असे पिल्लई म्हणाले. 

हेही वाचा