५० लाख १३ हजारांची आहे थकबाकी
पणजी : एसटी समाजातील बांधवांसाठी स्वयंरोजगारासाठी असलेल्या योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या १३ लाभार्थ्यांची एकूण ५० लाख १५ हजार रुपयांची थकबाकी असून, संबंधित रकमेची वसुली अद्याप झालेली नाही. यातील एका लाभार्थ्याची थकबाकी १० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात दिली.
आमदार एल्टन डिकोस्टा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०१९-२० ते २०२४-२५ या सहा वर्षांच्या कालावधीत अनुसूचित जमाती आर्थिक आणि विकास महामंडळातर्फे ४९ जणांना १ लाख ते १३ लाखांदरम्यान कर्ज मंजूर करण्यात आले. यातील १३ लाभार्थ्यांकडून ५०.१५ लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. या १३ जणांना एकूण १.०३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते.
ही योजना राबविण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र निधीची तरतूद नसून, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या सर्वसामान्य निधीतूनच याचे वितरण केले जाते. कर्ज वसुलीमधून जो निधी परत मिळतो, त्याचाच वापर नव्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी केला जातो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ओटीएस अद्याप नाही
संबंधीत कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी अद्याप एकरकमी परतफेड योजना सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्ज वसुलीच्या प्रक्रियेत अधिक अडथळे येत असून, महामंडळाने या थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.