४८३ बलात्कार प्रकरणांपैकी फक्त पाच प्रकरणात शिक्षा
पणजी : राज्यात मागील साडेपाच वर्षांत १७७ खून आणि ४८३ बलात्काराचे गुन्हे नोंद झाले. खुनाचे ९१.५२ टक्के म्हणजे १६२ गुन्ह्यांचा तर बलात्काराच्या ९५.६५ टक्के म्हणजे ४६२ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. तर, ३.३८ टक्के (६) खून तर, १.०३ टक्के (५) बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकाॅस्टा आणि हळदोणचे आमदार कार्लुस फेरेरा या तिघांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यांनी राज्यातील खून, बलात्कार आणि इतर गुन्ह्यांबाबत मागील साडे पाच वर्षांची माहिती मागवली होती. त्यानुसार, राज्यात मागील साडे पाच वर्षांत १७७ खून झाले. त्यातील १६२ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. तसेच १३२ खून प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही आकडेवारी ७४.५७ टक्के एवढी आहेत. तर ३.३८ टक्के म्हणजे ६ खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. एका प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपातून मुक्त केले आहे.
राज्यात मागील साडे पाच वर्षात ४८३ बलात्काराचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यातील ४६२ गुन्ह्यांतील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे छडा लावण्याची टक्केवारी ९५.६५ एवढी आहेत. तर फक्त पाच गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ही टक्केवारी फक्त १.०३ एवढी आहे. तर, सहा गुन्ह्यातील संशयितांविरोधात पुरावे नसल्यामुळे त्यांना आरोपातून मुक्त केले आहे. राज्यातील विविध न्यायालयात ३४६ बलात्कारांच्या गुन्ह्याची सुनावणी सुरू आहे. ही टक्केवारी ७१.६३ एवढी असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.