शिवोली येथील छाप्यात युवकाकडून ४.३० लाख रुपयांचा चरस जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून राजन शेट्टीयारला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th July, 12:22 am
शिवोली येथील छाप्यात युवकाकडून ४.३० लाख रुपयांचा चरस जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शिवोली येथे छापा टाकून राजन शेट्टीयार (३२, मूळ बंगळुरू) या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून ४.३० लाख रुपये किमतीचा ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) दिलेल्या माहितीनुसार, शिवोली येथील मैदानाजवळ ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती पथकाच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, एएनसीच्या अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर, कॉ. अक्षय नाईक, व्यंकटेश माईनकर, योगेश मडगावकर, तुषार परवार, देवराज नाईक, महिला कॉ. सीमा आर्परकर व इतर पथकाने मंगळवार, २२ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री १० वाजता शिवोली येथील मैदानाजवळ सापळा रचला. याचवेळी त्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाच्या नजरेस आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपण राजन शेट्टीयार (३२, मूळ बंगळुरू) असल्याची माहिती दिली. पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून ४.३० लाख रुपये किमतीचा ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला.

पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांनी संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २० (बी) (ii) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी बुधवार २३ रोजी संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

हेही वाचा