दोघा विदेशी नागरिक कैद्यांचा समावेश
म्हापसा : मध्यवर्ती कारागृह आणि पोलीस कोठडीत मागील पाच वर्षांत दोघा विदेशी नागरिकांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्व सहा संशयितांचे मनोरूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
आमदार वेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
२०२१ ते २०२५ या गेल्या चार वर्षांत पोलीस कोठडीतून मनोरूग्णालयात उपचार घेणाऱ्या सहा कैद्यांचा मृत्यू झाला. या सर्व संशयित आरोपींना दक्षिण गोवा पोलिसांनी अटक केली होती. त्यामध्ये रूझारिओ डिकॉस्ता (४९) यांना मडगाव पोलिसांनी अटक केली होती. सेबेस्तियन गुदिन्हो (६५), शांतव्वा (६५) व अमन मेंझ (३५) या तिघांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती.
तर, अनुप कामत (८०) यांना काणकोण व परारी (६९) यांना वास्को पोलिसांनी अटक केली होती. अटक झाल्यानंतर या सर्वांना बांबोळी येथील मनोरूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचे निधन झाले.
कोलवाळ कारागृहात १० कैद्यांचा मृत्यू
कोलवाळ कारागृहात २०२० ते जून २०२५ पर्यंत १० कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शिक्षा झालेल्या शैलेश मापारी, अंकाम्मा कोट्टापती, कायतान परेरा, टी. गोविंद राज, जॅक्सन दादेल या कैद्यांचा तर येल्लाप्पा कारबल, बाळा उर्फ शशिकांत नाईक, होंगजा यू उर्फ जय बाबा (कोरीयन), मोहम्मद रफी, ओझोमेना चिओगोले उर्फ टोगो (नायजेरियन) या अंडर ट्राईल कैद्यांचा समावेश आहे.