अज्ञाताचे कृत्य : फातोर्डा पोलिसांकडू्न तपास सुरू
मडगाव : बोर्डा मडगाव येथील देवराय इंदिरा ज्वेलर्स या दुकानात घुसून अनोळखी व्यक्तीने दुकानदार सोहन रायकर यांच्यावर हातोड्याने हल्ला केला. यात रायकर यांना दुखापत झाली आहे. संशयिताने कोणतीही चोरी केली नसल्याने फातोर्डा पोलिसांनी शस्त्राने हल्ला करत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
बोर्डा येथील देवराय इंदिरा ज्वेलर्स या सुवर्णलंकाराच्या दुकानात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी व तोंडावर मास्क लावला होता. आपल्या आईचे दागिने करायचे असल्याचे कारण सांगत सदर व्यक्ती दुकानात आली. पाठीवरील बॅग काढून संशयिताने त्यातील हातोडा काढला व दुकानदार सोहन रायकर याच्यावर हल्ला केला. रायकर यांनी प्रतिकार करतानाच दुकानातून बाहेर धाव घेतल्याने संशयिताने माघार घेतली. दुकानातील बॅग घेत घटनास्थळावरुन पळ काढला. त्यावेळी त्याच्या बॅगेतील चाकूही घटनास्थळी पडला होता. यानंतर फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्वानपथकाला पाचारण करीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी घेतलेले आहे. दुकानदार रायकर यांनी, दुकानातील कोणतीही वस्तू चोरण्यात आलेली असून केवळ आपणावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणात चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करता केवळ शस्त्राने हल्ला करत दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलीस उपनिरीक्षक सत्वशील देविदास तपास करीत आहेत. चाैकट
वाळके खून प्रकरणाची आठवण
बोर्डा येथील सोनाराच्या दुकानात घुसून त्याच्यावर हल्ल्याच्या या पार्श्वभूमीवर पाच वर्षांपूर्वीच्या मडगावातील स्वप्निल वाळके खून प्रकरणाची आठवण जागी झाली. २ सप्टेंबर २०२० मध्ये कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्निल यांच्यावर गोळीबार करीत चाकूने मारहाण करत खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सहा संशयितांनाही अटक केली होती. यानंतर नावेलीतील एका सोन्याचे दागिने बनवणार्या दुकानाची रेकी केलेल्या संशयितांनाही कर्नाटकात जाताना बंदुकीसह अटक केली होती. त्यामुळे मडगाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.