शिक्षेवर आज सुनावणी : २०२३ मध्ये रिसॉर्टच्या खोलीत केला हाेता अतिप्रसंग
पणजी : हडफडे येथे सहलीला गेलेल्या १८ वर्षीय युवतीवर तिच्या मैत्रिणीच्या प्रियकराने २०२३ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मूळ कर्नाटकातील पर्यटक टॅक्सी चालकाला पणजी येथील जलदगती न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला. दरम्यान, आरोपीच्या शिक्षेवर २१ रोजी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी पीडित युवतीने १ आॅगस्ट २०२३ रोजी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पर्यटक टॅक्सी चालकाने ३० जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४.४५ ते ५.५० या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. तक्रारदार युवती आपल्या एका मैत्रिणीसोबत हडफडे येथे सहलीसाठी गेली होती. तेथील एका अपार्टमेंटवजा रिसॉर्टच्या खोलीत त्या दोघी वास्तव्यास होत्या. त्यानंतर संशयित आरोपी तिथे आला. त्यांनी तिथे पार्टी केली. संशयिताने आपल्या प्रियसीला काही वस्तू आणण्यासाठी बाहेर दुकानावर पाठवले. ती प्लॅटमधून बाहेर जाताच संशयित पीडितीच्या बेडरूममध्ये गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित युवतीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करत घटनास्थळावरून पळ काढला. घडलेली घटना तिने बहिणीला सांगितले. तसेच पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध भा.दं.सं.च्या ३७६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून पणजी येथील जलदगती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन आरोपीविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. दरम्यान, सरकारी वकील अॅना मेडोंका यांनी युक्तिवाद मांडून आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. न्यायालयाने पुराव्यांची दखल घेऊन लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला दोषी ठरविले. आरोपीच्या शिक्षेवर २१ रोजी सुनावणी होणार आहे.
सहलीदरम्यान रिसॉर्टमध्ये तरुणीवर अत्याचार
तक्रारदार युवती आपल्या एका मैत्रिणीसोबत हडफडे येथे सहलीसाठी गेली होती. तेथे एका रिसॉर्टमधील खोलीत दोघी मुक्कामास होत्या. काही वेळाने, टॅक्सी चालक तिथे आला. त्याने आपल्या मैत्रिणीला काही वस्तू आणण्यासाठी दुकानात पाठवले. ती बाहेर गेल्यानंतर, पीडित युवती असलेल्या खोलीत गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.