वाहतूक खात्याकडून दिवसाला सरासरी १.२५ लाखांचा दंड वसूल

माहिती वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो : पाच वर्षांत २४.०७ कोटी रुपये दंड वसूल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July, 12:25 am
वाहतूक खात्याकडून दिवसाला सरासरी १.२५ लाखांचा दंड वसूल

पणजी : गेल्या काही वर्षांत गोवा राज्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२५ या कालावधीत वाहतूक खात्याने तब्बल २४.०७ कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला असून, त्याचा सरासरी हिशोब लावला असता महिन्याला ३८.२० लाख तर दिवसाला १.२५ लाख रुपये इतकी वसुली झाल्याची माहिती वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून दिली आहे. आमदार क्रुझ सिल्वा यांनी यासंदर्भात अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खात्याने जारी केलेल्या चलनांची रक्कम प्रत्यक्षात वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपेक्षा जास्त आहे. २०२०-२१ मध्ये ३०.३१ लाख रुपयांच्या चलनातून २८.९७ लाख रुपये वसूल करण्यात आले. २०२१-२२ मध्ये १.२४ कोटी रुपयांच्या चलनातून १.०९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२२-२३ मध्ये ४.२२ कोटी रुपयांच्या चलनातून ३.४९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२३-२४ मध्ये १३.४० कोटी रुपयांच्या चलनातून ८.५२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२४-२५ मध्ये आतापर्यंत २१.६२ कोटी रुपयांच्या चलनातून ९.४२ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
वाहतूक खात्याने १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२५ दरम्यान राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी २.७५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यादरम्यान मोले नाक्यावरून सर्वाधिक दंड वसूल झाला आहे. याशिवाय स्मार्ट कॅमेऱ्याद्वारे १ एप्रिल २०२३ ते ३० जून २०२५ दरम्यान २ लाख ११ हजार ३२३ चलने जारी करण्यात आली आहे. याद्वारे २२.४६ कोटी रुपयांचे चलन जारी केले होते. यातील ८.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून ७६.८६ कोटी दंड वसूल.
जानेवारी २०२० ते जून २०२५ दरम्यान गोवा पोलिसांच्या वाहतूक खात्याने वाहतूक उल्लंघनाबाबत २२ लाख ४३ हजार ५३४ प्रकरणांची नोंद केली आहे. यातून खात्याने ७६ कोटी ८६ लाख ८१ हजार ८५१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. फोंडा वाहतूक खात्याने सर्वाधिक २.५१ लाख प्रकरणांतून ८.९६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

हेही वाचा