उद्या ‘ऑरेंज अलर्ट’ : राज्यात २४ तासांत सरासरी ३.४१ इंच पाऊस
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेला टर्फ व अन्य वातावरणीय कारणांमुळे हवामान खात्याने राज्यात गुरुवार, २४ जुलै रोजी अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. २५ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
खात्याने २६ ते २९ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करून या चार दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. बुधवारी राज्याला पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे पडझड होऊन नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. रस्त्यांवर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. राज्यात २४ तासांत सरासरी ३.४१ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान दाबोळीत ४.५१ इंच, मुरगावमध्ये ४.२२ इंच, पणजीत ४.१२ इंच, जुने गोवेत ३.८७ इंच, काणकोणमध्ये ३.७७ इंच, फोंड्यात ३.६६, इंच तर मडगावमध्ये ३.८२ इंच पावसाची नोंद झाली.
बुधवारी पणजीत कमाल २८.५ अंश, तर किमान २३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २६.४ अंश, तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २७ ते २८ अंश व किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे अंजुणे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बुधवारअखेरीस अंजुणे धरणात ८१ टक्के पाणीसाठा होता. चापोलीत १०० टक्के, साळावली ११० टक्के, पंचवाडीत १०२ टक्के, तर गवाणेमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.
धारबांदोडा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस
राज्यात १ जून ते २३ जुलै दरम्यान सरासरी ७०.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान धारबांदोडामध्ये सर्वाधिक ९७ इंच पावसाची नोंद झाली. सांगेमध्ये ९०.७४, वाळपईमध्ये ८४.०६ इंच, केपेमध्ये ८३.०३ इंच, फोंडामध्ये ७८.५३ इंच, साखळीमध्ये ७०.७४ इंच, तर जुने गोवेत ६८.५९ इंच पावसाची नोंद झाली आहे.