राज्यात ‘टँकर राज’

पाणी पुरवठ्याची टंचाई, २६.५४ टक्के ग्राहकांनाच २४ तास पाणी


24th July, 12:22 am
राज्यात ‘टँकर राज’

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘हर घर नल से जल’ असा नारा राज्य सरकार देत असले, तरी प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याचा बराचसा भार टँकरद्वारेच पेलला जात असल्याचे चित्र गोव्यात दिसून येत आहे. सध्या केवळ २६.५४ टक्के ग्राहकांनाच पुरेसे २४ तास पाणी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ ७३ टक्के ग्राहक पुरेशा पाण्यापासून वंचित आहेत. सर्व तालुक्यांतील अनेक भागांत बाराही महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून हे स्पष्ट झाले आहे. राज्याला अंदाजे ६९५ एमएलडी पाण्याची गरज असताना सरकार फक्त ६३३ एमएलडी पाण्याचा पुरवठा करत आहे. त्यामुळे ६२ एमएलडी पाण्याचा तुटवडा असल्याचे दिसून येते. प्रत्येक घराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे सरकारचे मनसुबे असले, तरी पाणी पुरवठ्यातील हे वास्तव या इराद्यांना हादरा देणारे ठरले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या पेयजल पुरवठा खात्यातर्फे टँकरचा वापर करून तहान भागविण्यात येते. बाराही तालुक्यांतील अनेक ग्रामीण आणि काही शहरी भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जानेवारी २०२२ ते जून २०२५ या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास सत्तरी, फोंडा या तालुक्यांतील गावांना टँकरच्या पाण्याचाच आधार असल्याचे दिसून आले आहे.
साडेतीन वर्षांत टँकरच्या १.४४ लाख फेऱ्या
लेखी उत्तरात नमूद केल्याप्रमाणे, १२ तालुक्यांतील सुमारे १३० गावांमध्ये दर महिन्याला सुमारे ३,४०० टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होतो. साडेतीन वर्षांत अंदाजे १ लाख ४४ हजार ६०५ टँकरच्या फेऱ्या नोंद झाल्या आहेत.
तालुकानिहाय सातत्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारी गावे
तिसवाडी : पणजी, ताळगाव
फोंडा : फोंडा शहर, केरी, सावई-वेरे व इतर ३० गावे.
बार्देश : आसगाव, हणजूण, कायसूव, काणका, सुकूर, साल्वादोर द मुंद, पेन्ह द फ्रान्स, साळगाव, सांगोल्डा, रेईश-मागूश, मायणा-पिळर्ण, नेरुलसह एकूण १५ गावे.
डिचोली : साखळी शहर, हरवळे, सुर्ला, कुडणे, पाळी-कोठंबी, साळ, मये, वन म्हावळिंगे, कारापूर, सर्वण, चोडणसह एकूण १७ गावे.
मुरगाव : वास्को, दाबोळी, मुरगाव मतदारसंघातील गावे.
सांगे : नानुडे, सुळकर्णेसह एकूण १४ गावे.
धारबांदोडा : दाबाळ, सावर्डे, कुळेसह एकूण ५ गावे.
पेडणे : पेडणे, कोरगाव, पालये, हरमलसह २५ गावे.
वाळपई : शेळपे, ब्रह्मकरमळी, शिगाव, धावे, उस्ते, करंजोळ, सोनाळ, अडवई, वान्ते, हिवरे-बुद्रुक, झर्मे, होंडासह एकूण ८२ गावे.
काणकोण : सहा गावे.
केपे : पाच गावे.