परवाने थांबवण्याचा निर्णय : २०२२ मध्ये ३८, तर २०२४ मध्ये ९२ अपघात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात रेंट-अ-कार सेवा घेणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन वर्षांत या वाहनांच्या अपघातांचा आकडा ५४ ने वाढला आहे. २०२२ मध्ये ३८, तर २०२४ मध्ये तब्बल ९८ अपघात झाले. वाढत्या अपघातांमुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रेंट-अ-कार परवाने थांबवण्याचा निर्णय घेतला होता, असे लेखी उत्तर वाहतूकमंत्री माॅविन गुदिन्हो यांनी बुधवारी विधानसभेत दिले. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी याविषयीचा प्रश्न विचारला होता.
पर्यटकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर
पर्यटक राज्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी ‘रेंट-अ-कार’ व ‘रेंट-अ-बाईक’ यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पर्यटक मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे, कारच्या टपावर बसून प्रवास करणे, नो पार्किंग ठिकाणी वाहन उभे करणे, असे नियमबाह्य वर्तन करत असल्याचे दिसून आले आहे. नियमांना वाकुल्या दाखवणाऱ्या पर्यटकांकडून वाहतूक पोलिसांनी दंडही वसूल केला आहे. अनेकजण राज्यातील रस्त्यांच्या स्थितीबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्याने रेंट-अ-कार व्यवसायासाठी परवाना देण्यास स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. त्याचे पालन करत २४ फेब्रुवारी २०२४ रोजी वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत या निर्णयानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली. राज्यात आतापर्यंत दहा एजन्सींना रेंट अ कार व्यवसायाचे परवाने देण्यात आले आहेत. एकूण ६,७६२ रेंट-अ-कार परमिट्स जारी करण्यात आले आहेत.
या वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात होऊन स्थानिक रहिवासी व पर्यटक गंभीर जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रेंट-अ-कार धोरण पुन्हा विचाराधीन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील पर्यटन व्यवसायास प्रोत्साहन देतानाच पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याकरिता रेंट-अ-कार सेवा सुरळीत आणि जबाबदारीने चालवण्यासाठी यंत्रणा आणि प्रशिक्षण प्रणाली विकसित करणे काळाची गरज आहे.
दर महिन्याला सरासरी तीन अपघात
वाहतूक खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात दर महिन्याला सरासरी ३ अपघात हे रेंट-अ-कार वाहनांमुळे होत आहेत. २०२२ मध्ये ३८ अपघात झाले होते. २०२३ मध्ये ही संख्या ४३ झाली होती. २०२४ मध्ये मात्र तब्बल ९२ अपघात रेंट अ कार वाहनांमुळे झाले आहेत. २०२५ च्या सहा महिन्यांत (३० जूनपर्यंत) रेंट अ कार वाहनांच्या २८ अपघातांची नोंद झाली आहे.