म्हापशातील जुन्ता क्वार्टर्स इमारत सील

तीनही कुटुंबांनी जागा रिकामी केल्यानंतर पालिकेची कार्यवाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd July, 12:05 am
म्हापशातील जुन्ता क्वार्टर्स इमारत सील

आंगड, म्हापसा येथील जुन्ता क्वार्टर्स इमारतीचे प्रवेशद्वार सील करताना पालिका कर्मचारी. (उमेश झर्मेकर)  

म्हापसा : येथील जुन्या बाजारपेठेतील वर्षानुवर्षे जीर्ण अवस्थेत असलेली ‘जुंता क्वार्टर्स’ इमारत अखेर पालिकेने सील केली. ही इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. या इमारतीतील तिन्ही रहिवासी कुटुंबांनी घर रिकामे केल्यामुळे, सोमवारी २१ जुलै रोजी सांयकाळी पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात इमारतीचे चारही प्रवेशद्वार सील केले.
‘जुंता क्वार्टर्स’ ही इमारत गेल्या काही वर्षांपासून जीर्णावस्थेत असून, कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्वरित कारवाईची गरज होती. १६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला इमारत सील करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या स्वाक्षरीने इमारतीतील तीन कुटुंबांना २४ तासांत इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. सांतान बोर्जीस, अ‍ॅड. झुझार्ट आणि श्रीमती फर्नांडिस ही तिन्ही कुटुंबे येथे वास्तव्यास होती.
यातील एका कुटुंबाने मुदतवाढ मागितली होती. त्यांना महिन्याच्या सुरुवातीला एक आठवड्याची सवलत देण्यात आली. संबंधित कुटुंबाने देखील ठरलेल्या वेळेत जागा रिकामी केली. यानंतर पालिकेने शहानिशा करून कारवाईची पुढची प्रक्रिया सुरू केली.
२१ जुलै रोजी सायंकाळी पालिका कनिष्ठ अभियंता सुभा आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली, कनिष्ठ अभियंता मंथन कासकर, निरीक्षक नरसिंह राटवळ, कर्मचारी वामन पवार व इतर कर्मचाऱ्यांनी सील करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
पोलीस बंदोबस्तात इमारतीच्या सर्व चारही प्रवेशद्वारांवर पत्रे ठोकून दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे कोणतीही अनधिकृत व्यक्ती आत प्रवेश करू शकणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय
पालिका प्रशासनाच्या या कार्यवाहीचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. अशा धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. योग्य वेळी कारवाई झाल्यामुळे भविष्यातील संभाव्य अनर्थ टळल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा