रेंट-ए-कार परवान्यांसाठी कोणी पैसे घेतल्यास तक्रार द्या

सखोल चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July, 12:22 am
रेंट-ए-कार परवान्यांसाठी कोणी पैसे घेतल्यास तक्रार द्या

पणजी : रेंट-ए-कार परवान्यांच्या वाटपाच्या नावाखाली कोणाकडून पैसे घेतले गेले असतील, तर नागरिकांनी तक्रार दाखल करावी. अशा प्रकरणांची सरकारकडून सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
शून्य प्रहराच्या वेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी रेंट-ए-कार परवान्यांच्या वाटपासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, सध्या रेंट-ए-कार परवाने देण्यावर बंदी असतानाही काही एजन्सींनी परवाने मिळवून देण्याचे आश्वासन देत लोकांकडून पैसे उकळले आहेत. मात्र नंतर परिवहन खात्याने परवाने रद्द केल्यानंतर, संबंधित लोकांनी एजन्सीकडे पैसे मागितले असता, हे पैसे मंत्री माॅविन गुदिन्हो यांच्या पीएला दिले, असे सांगण्यात आल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
मंत्री माॅविन गुदिन्हो यांनी हा आरोप फेटाळून लावत, फक्त एकच फ्रँचायजी परवाना देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेंट-ए-कार परवाने देण्यावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही फ्रँचाय​जी नवीन रेंट अ कार ना जूने परवाने देत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही पद्धत बंद करण्यात आली. जर कोणत्याही एजन्सीने लोकांकडून परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले असतील, तर त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल करावी. अशा प्रकरणांची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करू, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले.

हेही वाचा