माजी आयआरएस अधिकाऱ्याची बागा-हडफडेत चॅपेलमध्ये घुसखोरी

लाकडी खुरीस चोरला : पोलिसांकडून विवेक बत्राला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd July, 12:00 am
माजी आयआरएस अधिकाऱ्याची बागा-हडफडेत चॅपेलमध्ये घुसखोरी

म्हापसा : बागा-हडफडे येथील समुद्रकिनाऱ्यावरील सेंट क्रॉस चॅपलचे कुलूप तोडून आतील एक लाकडी खुरीस चोरण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली विवेक बलवंतराय बत्रा (रा. मुंबई) याला अटक केली आहे. तर त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित बत्रा हे माजी भारतीय महसुल सेवा (आयआरएस) अधिकारी आहेत.
सोमवारी दि. २१ रोजी पहाटे ६.२० वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. तर हणजूण पोलिसांना याबाबतची कल्पना दुपारी १ वा. च्या दरम्यान देण्यात आली. याप्रकरणी चॅपेलचे अध्यक्ष रॉनी फर्नांडिस यांनी पोलिसांत दाखल केली आहे.
सकाळी डायगो फर्नांडिस या युवकाला सेंट क्रॉस चॅपेलच्या फाटकावरील कुलूप तोडत असल्याचे दिसून आले. हे कृत्य संशयित विवेक बत्रा हा आपल्या दोघा कामगारांच्या सहाय्याने करत असल्याचे फर्नांडिस यांनी पाहिले. त्यानंतर त्याने हा प्रकार सकाळी फिर्यादी रॉनी यांना सांगितला. तेव्हा इतरांसह फिर्यादी घटनास्थळी दाखल झाले.
तेव्हा चॅपेलच्या लोखंडी फाटकावरील कुलूप तोडण्यात आले होते. तसेच आतील एक लाकडी खुरीस गायब होता. तसेच मिलाग्रीस सायबीणची मूर्ती काढून बाजूला ठेवण्यात आली होती.
संशयितांनी ख्रिश्चन समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या चॅपेलच्या गेटचे कुलूप तोडले आणि गुन्हेगारी पद्धतीने आत घुसखोरी केली. तसेच एका खुरीसची चोरी करून वरील समुपदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या कृत्यामुळे जनतेत संताप निर्माण झाला. या आरोपाखाली पोलिसांनी संशयितांविरूद्ध भा.न्या.सं.च्या ३२९ (४), २९८, ३०५ व ३ (५) कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संशयित विवेक बत्रा

तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू
याप्रकाराची माहिती हणजूण पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. तसेच फिर्यादींनी​ संशयिताविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करीत संशयित आरोपी विवेक बत्रा यांनी सांयकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा कामगार बिकासकुमार महतो याला पकडून ताब्यात घेतले. शिवाय दुसऱ्या संशयित कामगाराचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा