मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आश्वासन
पणजी : आतापर्यंत ३७३ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून, उर्वरित २५ पात्र अर्जदार आणि ४० अपात्र ठरलेल्यांचा अर्ज फेरविचारासाठी घेण्यात येणार असून त्यांनाही येत्या १९ डिसेंबरपर्यंत नोकऱ्या देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सभागृहात दिली.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना ५० व्या वर्षी सरकारी नोकरी मिळाली, त्यामुळे त्यांना सेवा कालावधी कमी मिळाला. त्यांच्या बढती आणि पेन्शनच्या दृष्टीने विशेष तरतूद करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, मागील सरकारांनी याची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. मात्र त्यांच्या सरकारने या विषयात पुढाकार घेत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू केली.
एकूण ४३८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४० अर्ज अपात्र ठरले. उर्वरित पात्र उमेदवारांपैकी ३९८ जणांना ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील नोकऱ्या देण्यात आल्या. केवळ २५ उमेदवार सध्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. उरलेल्या २५ पात्र व ४० अपात्र ठरलेल्या अर्जांवर पुन्हा एकदा विचार करून १९ डिसेंबरपूर्वी सर्वांना नोकऱ्या देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.