काणकोण : खालवडे देळे येथे रविवारी सायंकाळी बैलांच्या धिरयोमुळे पंधरा मिनिटे वाहतूक ठप्प झाली. हा धिरयो दोघा बैलांमध्ये लागला होता. त्यात पावसाचा शिडकाव सुरू होता. तरीही हे दोघे आपल्या झुंजीत दंग होते.
दुचाकीने आलेल्या कित्येकांनी या बैलांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. तरी ते कुणालाच दाद देत नव्हते. त्यामुळे चावडीहून भाटपालच्या व भाटपालहून चावडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या दोन्ही बाजूनी रांगा लागल्या. यापूर्वी बैलांच्या झुंजी चालू असताना आपल्या दुचाकी तेथून घेऊन गेलेल्या दुचाकी चालकांना बैलाने जखमी केल्याच्या घटना काणकोणात घडलेल्या असल्याने आज या बैलांना हाकलण्याचे धाडस कोणी करू शकले नाही. दुचाकीवाल्यांबरोबरच चारचाकी चालक सुद्धा आपल्या गाड्या थांबवून भांडण (धिरयो) केव्हा संपेल याची प्रतीक्षा करीत होते. शेवटी एका बैलाने दुसऱ्याला परास्त केल्याने व पराभूत बैल रणांगण सोडून गेल्याने अखेर वाहतुकीला रस्ता मोकळा झाला. दोन्ही बाजूने आलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडून ते आपल्या मार्गाला लागले.