पणजी : जप्त केलेला ड्रग्ज व्यावसायिक प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने नानिएलुगो अबासिली (२३) या नायजेरियन विद्यार्थ्याचा जामीन फेटाळून लावला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. अपूर्वा नागवेकर यांनी दिला.
आराडी पर्रा येथे राहणारा एक नायजेरियन विद्यार्थी ड्रग्ज व्यवहारात गुंतल्याची माहिती तेलंगणा नार्कोटिक्स ब्युरोने गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला दिली होती. याची दखल घेऊन गुन्हा शाखेच्या पथकाने शनिवार, ९ मे २०२५ रोजी वरील ठिकाणी असलेल्या एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला. त्यावेळी गुन्हा शाखेने नानिएलुगो अबासिनी या २३ वर्षीय नायजेरियन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून १.६५ कोटी रुपये किमतीच्या १.१२३ किलो २,४०० एक्स्टसी गोळ्या, ६०.०९५ ग्रॅम एमडीएमए, ७ ग्रॅम कोकेन, ९९.०८२ ग्रॅम हेरॉईन व इतर ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी गुन्हा शाखेने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा, १९८५ कलम २१(बी) आणि २२(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
दरम्यान, संशयित नानिएलुगो अबासिली (२३) याने मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयिताकडून जप्त केलेले एक्स्टसी आणि एमडीएमए व्यावसायिक प्रमाणात असल्याचा दावा सरकारी वकील आर. बेरोटो यांनी केला. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताचा जामीन फेटाळून लावला.