महिलेची ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २.३१ लाखांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
महिलेची ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २.३१ लाखांची फसवणूक

वास्को : झुआरीनगर सांकवाळ येथील यासिका चोप्रा या महिलेला घरून काम करण्याचे आमिष दाखवून सुमारे २ लाख ३१ हजार रूपयांची फसवणूक केली. सदर घटना मे महिन्यात घडली. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेकडे एका अनोळखी व्यक्तीने वॉट्सअप व टेलिग्राम आयडीद्वारे संपर्क साधला. त्या व्यक्तीने महिलेला घरून काम करण्यासंबंधी आमिष दाखविले. त्यानंतर त्या व्यक्तीने हॉटेल्स रेटिंगचे काम पूर्ण करण्यास सांगितले. काही दिवसांनंतर त्या व्यक्तीने ‘मर्चंट वेलफेअर टास्क’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर तिला निरनिराळ्या बँक खात्यात रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्र्वास ठेऊन तिने आपल्या तसेच पतीच्या बँक खात्यातील रक्कम त्या व्यक्तीच्या निरनिराळ्या बँक खात्यामध्ये जमा केली. सदर रक्कम ४ मे ते २४ मे २०२५ या कालावधीत जमा करण्यात आली होती. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक चालविल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार केली. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा