म्हापसा : मायनात भाटी, हडफडे येथील घरफोडी प्रकरणी हणजूण पोलिसांनी आंध्रप्रदेश मधील सराईत गुन्हेगार मदिरीकरी विक्की उर्फ शेख शमीर (२०, रा. आंध्र प्रदेश व मूळ गुजरात) याला अटक केली.
घरफोडीची घटना १७ जून रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत घडली होती. याप्रकरणी ब्रेंडन माथाईस यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. अज्ञात चोराने फिर्यादींच्या घरातील बेडरूम खोलीच्या खिडकीची ग्रिल उघडून १ लाख रुपये किमतीचे मॅकबुक तसेच मर्सिडीज आणि बलेनो कारची चावी चोरुन नेली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणी चौकशी करून शुक्रवारी १८ रोजी संशयित आरोपीला पकडून अटक केली. संशयिताकडून वरील मॅकबुक समवेत तीन मोबाईल मिळून ३ लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
दरम्यान, संशयितावर आंध्रप्रदेशमध्ये एटीपी ३ टाऊन पोलीस स्थानकात घरफोडीचे पाच गुन्हे नोंद असून, त्याने प्रामुख्याने सोने चोरी केली आहे.