बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल निकेश च्यारीचा आणखी एक कारनामा

जुने गोवा परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघड : गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th July, 11:00 pm
बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल निकेश च्यारीचा आणखी एक कारनामा

पणजी : पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेला आयआरबी कॉन्स्टेबल निकेश च्यारी याने जुने गोवा परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जिनो सेबस्टियन यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची हिरो मेस्ट्रो दुचाकी १५ मे रोजी रात्री ११.३० वाजता कदंब बगलमार्गावर जवळ असलेल्या अक्षत रेसिडेन्सीमध्ये घराजवळ पार्क केली होती. त्यानंतर सकाळी दुचाकी चोरी गेल्याचे समोर आले. त्यानुसार, जुने गोवा पोलिसात तक्रार दाखल केली. याच दरम्यान पेडणे तालुक्यातील तोरसे येथे गुरुवार, १७ रोजी सकाळी वासंती रामा शेट्ये यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्यात आले होते. या प्रकरणात मोपा पोलिसांनी अटक केलेला निकेश च्यारी याने वरील दुचाकीचा वापर केल्याचे समोर आले. तसेच त्याने दुचाकी रस्त्यावर सोडून जंगलात पळ काढला होता. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली होती. या प्रकरणी चौकशी केली असता, दुचाकी जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार, मोपा पोलिसांनी जुने गोवा पोलिसांशी संपर्क साधून वरील माहिती दिली.